गुरुवार, १४ जुलै, २०२२

दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत "पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !: महाकवी हलबरजी नाग यांची एक सत्यकथा

दिल्लीपर्यंत  यायला पैसे नाहीत 
"पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !
: महाकवी हलबर
(एक अफलातून सत्यकथा) 

*
ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी "श्री" लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !

 जेव्हा त्यांना चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी सरकारला कळवलं की, 

दिल्ली पर्यंत  यायला पैसे नाहीत .
"पद्मश्री".... पोस्टाने पाठवा साहेब !
अजब आणि अफाट आहे ना हे ? 

मी सत्यकथा सांगतोय ओडिशातील हलधर नाग या अवलियाची. 
कोसली भाषेत कविता लिहिणारे प्रसिद्ध कवी, 

कहर म्हणजे त्यांनी आजवर जितक्या कविता आणि वीस महाकाव्य लिहिली आहेत ते सर्व त्यांना तोंडपाठ आहेत.
आणि आता तर संभलपूर विश्वविद्यालयात त्यांच्या "हलधर ग्रंथावली - भाग -2" याचा पाठयक्रमात समावेश करण्यात आलाय. 
साधाच वेष, शक्यतो पांढर धोतर, गळ्यात गमछा आणि बहुतेक वेळा अनवाणी फिरणारे हलधर एक अफलातून अवलिया आहेत . 

हे खरे तर इंडियन आयडॉल आहेत. पण  दुनियेतील रियालिटी शो मधल्याना आपले चॅनेलवाले हिरो करतात. आयडॉल ठरवतात. खरे आयडॉल तर हलधर नाग जी सारखे आहेत. चॅनेलवाल्याचे यांच्याकडे लक्ष कधी गेले तर याना पद्मश्री जाहीर झाल्यावर !
*
श्री हलधर जी याची जीवनकहाणी तुम्हालाही प्रेरणा देऊन जाईल. म्हणून तर ही पोस्ट करतोय. 

ते एका अत्यंत गरीब हरिजन कुटुंबातून आलेले, आईवडिलांचे निधन झाल्याने वयाच्या दहाव्याच वर्षी हलधर जी अनाथ झाले. त्यामुळे त्यांना इयत्ता तिसरीतच शाळा सोडावी लागली. पोटासाठी इतक्या लहान वयात ते ढाब्यावर खरकटी भांडी विसळण्याचे काम करू लागले. त्यानंतर एका गृहस्थाला त्याची दया आली व यांना एका शाळेच्या स्वयंपाक घरात काम मिळाले. तिथं थोडं स्थिरस्थावर आयुष्य त्यांना मिळालं. 

नंतर बँकेकडून त्यांनी शंभर रुपये कर्ज घेऊन पेन - पेन्सिल - शालेय वस्तूच्या विक्रीचे छोटेसे दुकान टाकले.  आणि उदरनिर्वाह त्यातूनच भागवू लागले. 
*
आता त्यांच्यातील साहित्यिक कौशल्याबद्दल सांगतो. श्री हलधर जी यांनी  1995 च्या सुमारास स्थानिक उडिया भाषेत "राम शबरी" सारखे काही धार्मिक प्रसंग निवडून त्यावर स्फुट लिहून ते लोकांना ऐकवू लागले. भावनेने ओथंबलेले त्यांचे ते शब्द ऐकताना लोक गुंग होऊन जायचे. पाहता पाहता त्यांच्या रचना प्रचंड लोकप्रिय झाल्या. हळूहळू ती कीर्ती सर्वदूर पसरू लागली. अनेक नामांकित लेखक कवींनी त्यांची दखल घेऊन विविध वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल भरभरून लिहिले. आणि अखेर दिल्लीपर्यंत त्यांची हि कीर्ती पोचली आणि त्यांना चक्क साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल "पद्मश्री" पुरस्कार जाहीर झाला. 

अजून एक कहर म्हणजे स्वतः हलधर जी फक्त तिसरी पर्यत शिकलेलं पण आजमितीस पाच पोस्ट ग्रॅज्युएट  विद्यार्थी त्यांच्या साहित्यावर पीएचडी करत आहेत. 
त्यांच्याबद्दल इतकंच म्हणावसं वाटत की, 

आप किताबो में प्रकृति को चुनते है 
पद्मश्री ने, प्रकृति से किताबे चुनी है।।

सामाजिक व्यवस्थेत मागे पडूनही साहित्य क्षेत्रात आकाशाला गवसणी घालण्या सारखे उत्तुंग कार्य केले आहे.

 भोवती अनुकूल काहीच नसतानाही यश खेचून आणणारे, दगडालाही फोडून त्यातून बाहेर उगवून येणारे हलधर जी सारख्या लोकांची चरित्रे का वाचायची ? तर आपल्यात, आपल्या पुढच्या पिढीत त्यातूनच ऊर्जा यावी.

 "सगळी परिस्थिती वाईट आहे. नाहीतर मी नक्कीच काहीतरी करून दाखवलं असत"
 अशी कारणे देऊन निराश झालेल्यासाठीच ही आजची हलधर जी याची कहाणी तुम्हांपुढे ठेवली. शेवटी मी नेहमी सांगतो तेच आज पुन्हा सांगतो, 

काहीही होवो..... रडायच नाही 
तर लढायच आणि लढून जिंकायच...

प्रणाम या अवलिया महाकवी हलधर जी बाबास .🙏🌹

बुधवार, १३ जुलै, २०२२

कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी सुत्रे :-*

*कसल्याही प्रकारच्या निराशेला नाहीशी करणारी सुत्रे :-*

*1) सतत पॉझीटीव्ह*
कितीही वाईट घडो, नेहमी पॉझीटीव्हच रहायचं!

*उदा.* “एक डोळा गमावला पण दुसरा डोळा शाबुत आहे,” ज्यामुळे मी हे सुंदर जग पाहु शकतो, देवाची किती कृपा आहे.

प्रत्येक अपयश मला एक संधी देऊन जात आहे.

*उदा.* जेव्हा लोक आपल्याला टाळतात, आपल्याकडे बघुन नाकं मुरडतात, तेव्हा तर अधिकधिक आकर्षक दिसण्याबद्द्ल, आपण जागरुक होतो.

आपली मस्करी उडवली की, आपला कोणी कळत नकळत अपमान केला की, आपल्यातल्या महत्वकांक्षा जागृत होतात.

*२) प्रेमात पडा*

आयुष्यात पोकळी आणि निराशा आली की एक असं पॅशन शोधावं, ज्यासाठी संपुर्ण आयुष्यच पणाला लावावं.

पॅशन म्हणजे अशी एखादी गोष्ट जी गोष्ट न थकता, अगदी उत्साहाने, महिन्याचे तीस दिवस, दिवसातल्या दहा-बारा तासाच्या वर आपण ते करु शकतो, ह्याला म्हणतात पॅशन!

त्या गोष्टीसाठी अक्षरशः आयुष्य झोकुन द्यावं. अगदी स्वतःला विसरायला लावतं, तेच खरं पॅशन!

कोणासाठी व्यापार हे पॅशन असेल, कोणासाठी खेळ हे पॅशन असेल, कोणासाठी भटकंती हेच पॅशन असेल.

त्याच्याशिवाय आपण जगु शकत नाही, आणि ,मग एके दिवशी जगही आपल्याला त्या एकाच गोष्टीसाठी ओळखु लागतं.
सचिन-क्रिकेट, धीरुभाई-रिलायन्स, अमिताभ-एक्टींग, लता मंगेशकर-गायन, मोदी-नेतृत्व, पटनायक-वाळुची शिल्पे, प्रकाश आमटे-आनंदवन, श्रीश्री रविशंकर गुरुजी – आर्ट ऑफ लिविंग, स्टीव्ह जॉब्ज-गॅझेट्स,

ह्या यादीत आपलंही नाव येऊ शकतं, आपणही आपल्या पॅशनसाठी वेडं बनलो तर!….

*३) महिन्याला दोन पुस्तके*

माझ्या आयुष्यातल्या अत्यंत वाईट आणि पडत्या काळामध्ये मला फक्त आणि फक्त चांगल्या विचारांच्या पुस्तकांनीच तारलं, नाहीतर कदाचित मी आज हा लेख लिहायला शिल्लकच राहीलो नसतो, इतके पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत.

महिन्याला कमीत कमी दोन तरी चांगली पुस्तके तरी वाचुनच काढेन आणि त्यातल्या चांगल्या गोष्टी तात्काळ जीवनात आणेन, हा चंगच बांधावा, आपोआप जे जे हवे ते सारे मिळत जाते, हा माझा स्व-अनुभव आहे.

*4) डायरी लिहा*

दररोज घडलेल्या बर्‍या वाईट घटना आपल्याला बहुमुल्य अनुभव देऊन जातात, त्यांना शब्दबद्ध करत गेलं की जगण्याची रंगत वाढत जाते.

माझ्या मनात चाललेले द्वंद बाहेर काढण्यासाठी मला ह्या डायर्‍यांनी खुप मदत केली. झालेले अपमान, आलेले अपयश, भविष्याच्या चिंता, मनाचं रिकामपण, सगळी मळमळ मी बाहेर काढली, आणि प्रत्येक जखम डायर्‍यांमध्ये जपुन ठेवली, आणि शहाण्या बाळांसारखं त्या सर्वांनीही मला त्रास देणं बंदच करुन टाकलं.

आजही माझ्या कॉम्पूटर मध्ये मी स्वतःलाच लिहलेली शेकडो पत्रं आहेत, जी वाचुन मला आता खुप गंमत वाटते. कधी छोट्यामोठ्या कारणाने मी खचलो की ते वाचुन प्रचंड बळ मिळतं. बॅटरी पुन्हा टणाटण चार्ज होते.

*5) जे सुरु केलंय त्याचा शेवट करा*

हातात घेतलेलं काम पुर्ण करायचं म्हणजे करायचं!

मनावर विजय मिळवण्यासाठी मनाचाच वापर करायचा, काम सुरु होतानाच असं भासवायचं की ते पुर्ण झालेलं आहे,

आणि मन गोंधळुन जातं आणि ते पुर्ण करुनच एका जागेवर शांत बसतं!

‘आसान है’ हा यशाचा मुलमंत्र नेहमी लक्षात ठेवायचा!

*6) कंफर्ट झोन तोडा. नवी आव्हाने स्वीकारा*

तु मागच्या एक महिन्यामध्ये अशी कोणतीही एक गोष्ट केलीस का, जे तुला येत नाही, जे करण्याची तुला भिती वाटते?

मी असा वेडेपणा खुपदा केलाय, मला पेंटींग येत नसताना मी माझ्या ऑफीसला स्वतःच्या हातानी पेंट दिला.

मागच्या वर्षी, माझी खरी ओळख लपवुन मी गावाबाहेरच्या एका सुताराच्या हाताखाली मी एक आठवडा रोज चार तास हेल्पर म्हणुन काम केलं.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मी बॅग भरुन घराबाहेर पडलो, पण मी कुठे जाणार मलाच माहित नव्हते, त्या पाच दिवसात मी अनेक गडकिल्ले भटकुन आलो. अनेक थरारक अनुभव घेतले, स्वतःसोबत घालवलेले ते पाच दिवस मी कधीही विसरणार नाही.

नवरात्रीमध्ये उजनी-तुळजापुर हे सदतीस किलोमीटर अंतर मी एका रात्रीत चालत गेलो, तो ही एक आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव होता.

*7) कमीत कमी तीस मिनीट व्यायाम*

मनाला ताजंतवाणं ठेवण्याचा हुकुमी एक्का आहे, शरीराला व्यायाम करायला भाग पाडायचं, मन आपोआप ताळ्यावर येतं!

जगातल्या प्रत्येक यशस्वी व्यक्तीला हे सुत्र माहित आहे.
*8) ध्यान, सर्व समस्यांवर रामबाण उपाय*

तुझं शारीरीक व्यंग हे तुझ्या आयुष्यात कधीही अडथळा बनु शकत नाही, कारण तु म्हणजे तुझं शरीर नाहीस!

खरा तु तर वेगळाच कोणीतरी आहेस, हे तुला ध्यान करायला लागलं की आपोआप उमगत जाईल.

आतापर्यंत केला नसशील तर एकदा आर्ट ऑफ लिविंगचा हॅपिनेस कोर्स नक्की कर.

*9) महिन्याला एक वाईट सवय सोडा*

आपल्या प्रत्येकामध्ये वाईट सवयी असतात, मी एका महिन्याला एक वाईट सवय सोडायची आहे, आणि एक चांगली सवय जोडायची आहे, असं प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अंतर्मनाला सांगतो.

महिनाभर त्याची कसोशीने अंमलबजावणी करतो.

*10) आपल्या आजुबाजुला प्रसन्नतेचा शिडकावा करा*

घरातुन बाहेर पडण्याआधी एकदा आरशात बघुन स्वतःलाच वचन देतो की आज माझ्या संपर्कात येणार्‍या प्रत्येक व्यक्तीला मी आनंद आणि प्रसन्नता वाटणार आहे.

प्रत्येकाच्या चेहर्‍यावर हसु फुलवणार आहे.

कधी एखाद्या उपाशी माणसाला पोटभर खावु घालावं, कधी एखाद्या लहान मुलाशी लहान बनुन खेळावं!

कधी रस्त्याने जाताना कोणाला लिफ्ट द्यावी, कधी जोक्स सांगुन लोकांना खळखळुन हसवावे.

*11) जे मिळालयं त्याबद्द्ल कृतज्ञ रहा.*

जो कृतज्ञ आहे, त्यालाच ब्रम्हांड अजुन जास्त भरभरुन देतं, हेच सिक्रेट आहे.

आपल्याला मिळालेल्या दहा वरदानांबद्द्ल रोज मनःपुर्वक आभार व्यक्त केल्यास आयुष्यातली सगळी दुःखे आपोआप नाहीशी होतात, याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

*१2) यशस्वी लोकांसोबत मैत्री करा*

असे लोक ज्यांनी स्वतःचा ठसा ह्या जगात उमटवला आहे, त्यांच्याशी अधिकाधिक ओळखी कराव्यात, त्यांच्याशी भेटण्याच्या संधी शोधाव्यात.

यश ही उत्साहासारखं संसर्गजन्य असतं!

*13) सुरक्षित अंतर ठेवा*

*जे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करतात, आपली टर उडवतात, अशा लोकांपासुन चार हात दुर रहावे, दुर्लक्ष करावे.*

*निगेटीव्ह लोकांना आपल्या आयुष्यात आणि आपल्या मनात कुठेही स्थान देऊ नये, भेटु देखील नये.*

*14) तीस दिवसांचा प्लान*

पुढच्या तीस दिवसात मी काय करणार आहे, ह्याचा प्लान महिन्याच्या सुरुवातीला तयार करुन भिंतीला चिटकवुन टाकावा.

एकेक लक्ष्य साध्य केलं की ‘विजयी’ असं लिहुन त्याचं अगदी उत्साहाने आणि आनंदाने ‘सेलिब्रेशन’ करावं!…
            संकलित

मंगळवार, १२ जुलै, २०२२

गुरुपौर्णिमा - गुरूबद्दल भव्य आदर व्यक्त करण्याचा दिवस


*गुरुपौर्णिमा - गुरूबद्दल भव्य आदर व्यक्त करण्याचा दिवस*

आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.

आषाढ शुद्ध पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा 'व्यासपौर्णिमा' असे म्हणतात. या दिवशी आपल्या गुरुची पूजा करण्याची प्रथा आहे. गुरुपौर्णिमा म्हणजे एक प्राचीन काळापासून चालत असलेली परंपरा आहे. आषाढ पौर्णिमा हा दिवस महर्षी वेदव्यास यांचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो.महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.

त्याचबरोबर बोधी प्राप्ती नंतर बुद्धांनी आपला प्रथम धर्मोपदेशक सारनाथ येथे कौण्डिण्य, वप्प, भद्दीय, अस्सजि आणि महानाम या पाच भिख्खूंना दिला. बौद्ध इतिहासामध्ये पहिल्या धर्मोपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राने संबोधिले जाते आणि पाच भिक्षूंना पंचवर्गीय भिक्षु म्हणून ओळखले जाते.आषाढ़ पौर्णिमेच्या ज्या दिवशी बुद्धांनी पाच भिक्षुंना पहिला धर्मोपदेश दिला ती  हीच पौर्णिमा आज गुरुपौर्णिमेच्या नावाने प्रचलित आहे. आषाढ पौर्णिमा कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार आणि  इतर वेगवेगळ्या देशामंध्ये साजरी केली जाते. 

आषाढ पौर्णिमाच्या निमित्ताने तथागतांचे (गौतम बुद्ध) काही संदर्भ .....

१. आषाढी पौर्णिमा या पवित्र पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो. जेथे ३ महिने भिक्षु आणि उपासक धम्माचा अभ्यास करतात.

२. याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी सिद्धार्थ गौतमाने आपले शाही जीवन त्यागले होते त्यास (महाभिनिष्क्रमण) या नावाने ओळखले जाते.

३. राजकुमार सिद्धार्थ आणि राणी यशोधरा यांचे एकमात्र पुत्र राजकुमार राहुल यांचा जन्म ही याच दिनी झाला.

४. भगवान बुद्धांनी त्यांचा प्रथम उपदेश सुद्धा याच पवित्र पौर्णिमेच्या दिनी दिला जो पुढे धम्मचक्रप्रवर्तन सुत्त म्हणून प्रसिद्ध झाला.

५. तवातिंसा देवलोकात जाऊन ३ महिने त्यांची माता राणी महामाया यांना अभिधम्माचा उपदेश दिला.

पापाचे दहन करणारा  बुद्धरूपी साथी , म्हणजे गुरू.  या पलीकडे जे बुद्ध तत्व आहे ते जाणण्यासाठी गुरुंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळखणारा गुरुच असतो व गुरु स्वत: प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो.   

एकदा एक बाई बाळंतीण झाली, आणि ताबडतोब तिच्या मुलाला दुसरीकडे नेले. पुढे काही वर्षांनी त्या दोघांची भेट झाली, तेव्हा मुलाला ही माझी आई, आणि त्या बाईला हा माझा मुलगा, हे ओळखता आले नाही. तशासारखे आपले झाले आहे. आपण इथे  पृथ्वीवर कशाकरिता जन्माला आलो ? हेच विसरलो आहोत. खरे म्हणजे, आपण काही एका निश्चित कार्याकरिता जन्मलो आहोत; ते म्हणजे मनुष्य देहात बुद्धात्म्याची  ओळख करून घेणे हे होय. परंतु आपण विषयात पडल्यामुळे बुद्धात्म्याची ओळख विसरतो, विषयातच आनंद मानू लागलो आणि त्यातच सुख मिळावे अशी आशा करीत राहिलो. पण विषयच जरे खोटे, तर त्यापासून सुख तरी कसे मिळणार ? आणि जे सुख मिळते, तेही अंती खोटेच ठरते! म्हणून विषयापासून आपण विरक्त व्हावे तेव्हाच भक्ति करता येते. जिथे विषयविरक्ति झाली तिथेच   बुद्धभक्तिला सुरुवात होते.

*महर्षि व्यास*

महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होत. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी  महाभारत  लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व अलौकिक ग्रंथापैकी एक ग्रंथ! महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. महान ऋषि पराशर यांच्या सहवासात मत्सगंधा नावाच्या कुमारिकेला पुत्रप्राप्ती झाली. त्यांनाच आपण वेदव्यास या नावाने ओळखतो. महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात. 

गुरूंचे महत्व 

 प्रत्येकाने आपल्या गुरूला  वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. वेदव्यास ऋषी त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी वैदिक धर्माची श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे वैदिक संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.

व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण   - महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. 

 दत्त संप्रदाय मध्ये गुरूंचे महत्व 

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील दत्तभक्त देखील आषाढ पौर्णिमा   हा पूण्यपावन दिवस समजतात ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतात. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतात. वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु - पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात. 

खरं गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन !

गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने नेहमी भरून  यायला हवे. अशावेळी आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -

गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।

गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥ 

गुरु दोन प्रकारचे असतात .एक गुरु ! एक सदगुरु ! अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की -

“जो जो जयाचा घेतला गुण । तो म्यां गुरु केला जाण ।

"गुरुसी पडले अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥”

 असे सांगून अवधूतांनी २४ गुरु केले. या चोविसांचे महत्व तीन प्रकारांत आहे. 

( एक )सदगुण अंगीकारासाठी गुरू.

( दोन )अवगुण त्यागासाठी गुरु   आणि 

( तीन ) ज्ञानप्राप्तीसाठी गुरु.

 म्हणजे ‘गुरु’ हे लौकिक दॄष्टीने जे मार्गदर्शन करतात ते या विभागात येतील.

ज्यांनी आत्मनामविवेक सांगून मायेच्या संसाररूपी पुरातून मला वाचविले तो सदगुरु अखंड माझ्या ह्र्दयात आहे, म्हणूनच माझे या विवेकावर प्रेम आहे. आदर आहे. ज्याप्रमाणे डोळ्यांत अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते त्या दृष्टीने भूमिगत धन दिसू लागते, असे म्हणतात  तसे गुरुमुळे दडलेले ज्ञान स्पष्ट दिसू लागते. 

गुरू - शिष्य महान परंपरा

आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.  गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.  द्रोणाचार्य-अर्जुन , तुकोबा - शिवराय , xxxxx - एकलव्य . अशी गुरु-शिष्य परंपरा आहे. मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे एकलव्याप्रमाणे आपणही गुरू मानावा आणि अखंड प्रयत्न करावेत.  पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.

गुरूंचे आपल्या जीवनात महत्व 

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लावू?’ हेच खरे आहे. गुरू-अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात ते! 

गुरू आणि सदगुरु 

आपल्या जीवनात गुरुंना जेवढे महत्त्व आहे तेवढेच किंबहुना त्यापेक्षा जास्त महत्त्व सदगुरुंना आहे. सर्व मानवजातीला पारमार्थिक, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवणारे, भक्ताला, साधकाला मोक्षाप्रत नेणारे सदगुरु, त्यांच्या स्मरणासाठी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ (आषाढ पौर्णिमा) हा पर्वकाल सांगितला आहे. 

‘गुरुबिन कौन बतायें ‘बाँट ।’ हा मायारूपी भवसागर तरून जायचे असेल तर सदगुरुंची आवश्यकता आहे. सदगुरुच आपल्याला मोक्षाप्रत नेतात. एकदा त्यांना आपला हात हातात घेतला की ते आपल्याला सोडत नाहीत. सदगुरुंना शोधण्यासाठी आपणांस जावे लागते असे नाही, तर शिष्याची आध्यात्मिक तयारी झाली की, ते स्वत:हूनही त्याला शोधत येतात. आपल्या पूर्व कर्मानुसार आपल्याला सदगुरु भेटतात. सदगुरुंकडून एकदा का अनुग्रह घेतला की, त्याचे स्मरण अहोरात्र करावयाचे असते. सदगुरुंनी दिलेल्या नामात खूप मोठी शक्ती आहे. नामधारकाच्या मागे-पुढे उभे राहून ते नाम त्यांच्याकडून पूर्ण करून घेतात. तसेच त्यांची त्यात सत्ता पण असते. सदगुरुच सर्व काही करवून घेत असल्यामुळे नामधारकाच्या ‘मी’ ला कुठेही वाव नसतो. सदगुरुंकडून अनुग्रह घेतला की दुसऱ्या कोणत्याही संतांकडून अनुग्रह घेऊ नये अशी संकल्पना आहे. त्यांच्याशी एकनिष्ठेने राहावे. एक गुरु, एक नाम असावे. त्यांनी दिलेल्या नामात भगवंताचे प्रेम असते.

सदगुरुंची प्राप्ती झाल्यानंतर ‘गुरुसेवा’ करणे हे शिष्याचे परमकर्तव्य आहे. गुरुसेवा म्हणजे त्यांची आज्ञा पाळणे. मनात कोणताही किंतू न ठेवता, विकल्प येऊ न देता त्यांनी सांगितलेली साधना नित्यनियमाने प्रेमाने करावी. तसेच साधकाची संपूर्ण शरणागती असावी. सदगुरूला शरण जाणे म्हणजे...

१) सदगुरु ठेवतील त्या अवस्थेत समाधानात राहणे. 

२) त्यांच्या इच्छेत आपली इच्छा मिसळणे. 

३) कोणत्याही परिस्थितीत नाम घेण्याचे सोडू नये. 

४) नामावर, सदगुरूवर पूर्ण विश्वास, श्रद्धा ठेवणे. 

सदगुरुंनी सांगितलेले साधन न करता इतर साधन केल्यास वृथा कष्टच होतील आणि पदरात काही पडणार नाही. सदगुरुंना जे शरण जातात त्यांचा कार्यभार सदगुरु उचलतात. त्यांच्या मागे-पुढे उभे राहून ते सत्तारूपाने त्यांना मदत करतात. सदगुरु नावाड्याचे काम करतात. आपली जीवनरूपी नौका योग्य दिशेला घेऊन जातात.

सदगुरुंचे ‘अनुसंधान’ राखणे महत्त्वाचे. कोणतेही प्रापंचिक काम करत असताना सदगुरुंवर मन एकाग्र करणे यालाच अनुसंधान असे म्हणतात. सदगुरुंना दृष्टीआड होऊ न देणे म्हणजेच अनुसंधान. अनुसंधान ठेवण्यासाठी त्यांनी दिलेले नाम नियमितपणे घेणे. कर्म ,क्रियाकल्प म्हणजेच प्रपंच करताना आपले लक्ष मात्र सदगुरूंच्या चरणी असावे. ते म्हणजेच अनुसंधान.  भगवंताच्या आशीर्वादानेच आपली सदगुरुंशी भेट होते व सदगुरुंकडे नाम मिळाल्यानंतरच ईश्वराच्या व्यापक स्वरूपाची महती कळते.

गुरु कोणाला करावे ? जिथे आपले समाधान होते, संशय, शंका फिटतात तेच गुरुपद म्हणावे. गुरुपद, गुरुतत्व सर्व ठिकाणी एकच असते म्हणूनच ---

ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे । 

त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ।।

मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । 

तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ॥

गुरुतत्व एकच असल्यामुळे सर्व सदगुरुंमध्ये आपले सदगुरु आपल्याला पाहता आले पाहिजे. हे सद्गुरु साधकाला समाधानात ठेवून संकटे सहन करण्याची शक्ती देतात. साधकाच्या प्रारब्धात यत्किंचितही बदल, फेरफार करत नाही. परंतु तो भोग सोयीने (सहजतेने) भोगण्याची तरतूद मात्र निश्चितपणे करतात. भोगाची तीव्रता कमी करतात. भोग भोगताना जी मदत आवश्यक असेल त्याबद्दल मार्गदर्शन करतात. (उदा. पैशाची सोय, मनुष्यबळ, हवी ती व्यक्ती भेटणे.)

आपल्याला जर आध्यात्मिक ज्ञान मिळावे असे वाटत असेल तर सदभावाने सदगुरु चरणाची सेवा करावी. जिथे गुरुक्षेत्र आहे तिथेच मोक्ष देणारी काशी, पंढरपूर आहे हे ध्यानात घ्यावे. सर्व तिर्थे तिथे लोळण घेत असतात. देवांचे देव सुद्धा तिथे वस्तीस आलेले असतात. सदगुरुंचा महिमा अपार आहे. तो ऋषींनाही वर्णन करता आला नाही. त्यांची लीला अगाध आहे. तिथे मुकेही बोलतात, लुळे काम करतात, पांगळे पर्वत चढून जातात. 

सदगुरु म्हणजे वैराग्याचे मंदिर, शांतीसुखाचे माहेर, शमदमन केलेले, भक्तिज्ञानाची पेठ, शुध्दभाव इ. गोष्टी त्यांचे ठायी असतात. जेव्हा साधकाला अनुग्रह होतो तेव्हा तो त्याचा दुसरा जन्म असतो. त्याच्या साधना काळात सदगुरु साधकाचे सर्वतोपरी रक्षण करतात. सदगुरु आपल्या जीवनाला, विचारांना दिशा देतात. वेळोवेळी मार्गदर्शन मिळते. जीवन सुपंथावर चालते. अध्यात्मज्ञान त्यांच्या कृपेनेच मिळते. सदगुरुंचा सहवास हा सुमधुर असतो. ते चालते-बोलते ईश्वराचे अंशच असतात.

साधकाने कोणत्याही गुरुंची निंदा करू नये.  गुरुनिंदा करणे म्हणजे महापाप होय. गुरु ही कोणी व्यक्ती नसून ती एक चैतन्यशक्ती आहे हे प्रॅक्टिकल प्रोसेसने समजून घ्यायला हवे .

श्री गुरुंचे सतत स्मरण, गुरुंनी दिलेल्या नामाची  सदासर्वकाळ आठवण - स्मरण, त्यांची आज्ञा प्रमाण मानून त्याप्रमाणे मनापासून आचरण करणे. काया-वाचा मने, श्वेने-वित्ते-प्राणे गुरूंची सेवा होणे आवश्यक आहे. श्रीगुरु दयेचे सागर, शांतीचा महामेरू, आणि उच्चतम प्रतीची क्षमा ह्या तिन्हीची वस्ती त्यांचे ठायी असते. भक्ति-मुक्ति देणारे, त्रिकालध्यानी, ध्यानास बसल्यास त्यांचेच स्मरण, पुजेस गुरूंचे  चरण, मंत्र - त्यांनी दिलेले नाम. एवढे झाल्यास श्रीगुरुंची कृपा होऊन साधक मोक्षाप्रत जातात. तेव्हा श्रीगुरुंचेच स्मरण, चिंतन आणि नमन करावे.

एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात.गुरूने सांगितलेले साधन अनन्यतेने सांभाळावे.

गुरु तरी काय करतो?  तर जीवनात विषय हे खोटे आहेत, त्यात आपल्याला सुख मिळणार नाही हेच दाखवितो. म्हणून, तो जे सांगेल तसे वागणे यातच आपले हित असते. गुरूने सांगितल्या शिवाय जे जे साधन कराल, ते ते फक्त कष्टालाच कारण होईल. साधनाची कितीही आटाआटी केली आणि शरीराला कष्ट दिले, तरी ते व्यर्थ जातील. कारण, गुरू व्यतिरिक्त जी खटपट, ती फारशी उपयोगी नसते. गुरूने सांगितलेले साधन हलके मानून आपल्या मनाने केलेले साधन आपल्याला बरे वाटते, म्हणजे गुरूला गौणपणा दिल्यासारखे झाले ! वास्तविक पाहता गुरू हा  सर्वज्ञाता  आहे, ही भावना दृढ झाली पाहिजे. ती तशी झाली म्हणजे त्याच्या वचनावर विश्वास बसतो, आणि गुरू सांगेल तेच साधन खरे वाटू लागते. कुठेतरी आपले प्रेम असावे, कुणाला तरी आपला विश्वास असावा, कुठेतरी आपलेपणा असावा. आपण त्याचे होऊन राहावे अशी नेहमी इच्छा धरावी. जितक्या अपेक्षेने आपण प्रपंचात सुख मिळविण्यासाठी धडपड करतो, तितकी सर्व अपेक्षा जर गुरुकडे लावली तर आपल्याला सुख खात्रीने मिळेल यात शंका नाही.

गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.

गुरु म्हणजे एक अशी सतार आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहुत स्वर ऐकू यायला सुरुवात होते.

गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.

गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला  प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.

गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.

गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.

गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.

गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान  पूर्णपणे नव्हे तर  कायमची  शमते.

गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.

शिष्य म्हणून ........

दिवसागणिक वाचावे 

अखंड गुरुशी भजावे

पण गुरू पूजा करणाऱ्यांना अंतःकरणात म्हणत असतो की,

का पूजिता आम्हां गुरू। पूजा घेतो सद्गुरू।।१।।आम्ही हमाल झालो दास। गुरुपदवी नको आम्हांस ।।२।।मृदेचा गणपती। मृदेसी काय महती।।३।।गणपूजा गणासी पावी। मृदा मृदेमाजी समावी ।।४।।ब्रह्मांड नेणो माजी। बिंदू म्हणे केली कांजी।।५।।त्याचे थोरपण तेणेंची घेणे। आम्हा शिष्यरूपी राहणे ।। ६।।

( श्री संत तुकाराम महाराज याना क्षमा मागून )

(सोशल मीडिया वरून संकलन.............)
🌹💐🌹💐🌹💐🌹
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

*कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण !!*

*कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज व चहा प्रकरण !!*

               गंगाराम कांबळे नावाच्या एका अस्पृश्यांला तत्कालीन महार समाजाच्या नागरिकास महाराजांनी कोल्हापूरच्या राज रस्त्यावर हॉटेल सुरू करण्यासाठी जागा दिली,भांडवलही दिले व कांबळेचे *"सत्यसुधारक"* नावाचे हॉटेल सुरू झाले. दुकान तर सुरू झाले पण महाराच्या हातचा चहा कोण पिणार, गंगारामला काय करावे सुचेना. शेवटी ही गोष्ट महाराजांपर्यंत गेली. त्यावर महाराजांनी एक युक्ती काढली. दररोज शाहू महाराजांची घोडागाडी गंगारामच्या दुकानपुढे थांबु लागली, महाराजांच्या गाडीत वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक असायचे व महाराज त्यांना घेवून दुकानात यायचे व आपल्या भरदस्त आवाजात चहा मागवायचे, "गंगाराम सर्वांना चहा आण"... स्वतः महाराज चहा पिताना दिसल्यावर बाकीच्यांना तो निमूटपणे प्यायला लागे, एवढेच नाहीं तर ज्यांना कुणास सरकारी कागदपत्रावर सही हवी असेल तर सकाळी "सत्यसुधारक" मध्येच येणे असा नियमच महाराजांनी पाडला. त्यामुळे सकाळी दुकानावर प्रचंड गर्दी व्हायची. महाराज गंगारामने केलेला चहा पाजायचे आणि मगच सही करायचे अशी पद्धत होती. 

*राजर्षी शाहू महाराजांची सत्यशोधक चळवळ....*
          जेव्हा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलात छत्रपती शाहू महाराज चहा पिण्यासाठी जातात...
काय रे तू हॉटेल काढलयसं म्हणं? खरं काय?'राजर्षी शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना विचारलं.
'होय महाराज, आपणच सांगितलं काही तरी स्वतंत्र धंदा सुरू कर म्हणून,!' गंगाराम कांबळे यांनी उत्तर दिलं.
'मग, पाटी का लावली नाहीस कुणाचं हॉटेल आहे म्हणून?
''काय म्हणून पाटी लावायची महाराज? 
माझी काय कुणावर सक्ती आहे? 
सगळ्या हाटेलवर काय जातीच्या पाट्या लागल्यात?
'असं, व्हय? खरं हाय तुझं. आतापर्यंत किती लोक चहा प्यायले तुझ्या दुकानात?''
 बरेच लोक प्यायलेत. मला संख्या माहीत नाही.
''मग सगळ्या गावालाच बाटवलसं की तू. बरं तर चांगला चहा करून ठेव. जाताना येतो मी.

        'महाराजांनी आपण चहा प्यायला येणार हे बाहेर गाडीत बसूनच सांगितलं. महाराज गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहासाठी येणार, ही बातमी म्हणता म्हणता सगळ्या कोल्हापुरात पसरली. महाराज येण्यापूर्वीच अनेक लोक हॉटेलसमोर थांबले. या सगळ्या लोकांसमक्ष महाराज इथं चहा प्यायले. आणि त्यांच्या गाडीतल्या इतर मंडळींनाही चहा पाजला....चहा घेऊन झाल्यानंतर महाराज गंगाराम यांना म्हणाले, *"तू सोडावॉटरचं यंत्रही घे. मी घेऊन देईन तुला."* महाराजांनी गंगाराम कांबळे यांना हॉटेलमध्ये सोडावॉटरचं मशिनही घेऊन दिलं. गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातल्या भाऊसिंगजी रोडवर हॉटेल सुरू केलं होत. या घटनेला १०० वर्षांपेक्षा अधिक काळ झाला.
             राजर्षी शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातला हा संवाद बरंच काही सांगतो. 
  
  *कृतीतून दिला संदेश..*
          शाहू महाराजांनी समाजाला दुभंगीत करणाऱ्या आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या सर्व अनिष्ट प्रथा आणि व्यवस्थांच्या मुळाशी जाऊन त्यांची उत्तरं शोधण्याचा, त्यांना मानवी पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला. उदात्त मानवी जीवन उभारण्याची त्यांची एक खास शैली होती. ती कधी सडेतोड, कधी मुत्सद्देगिरीची, कधी अपरंपार प्रेमाची, कधी प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणारी तर कधी मिश्किलपणे धडा शिकवणारी होती.तो काळच असा होता की अस्पृश्यांना शिवणे म्हणजे मोठी अपवित्र गोष्ट आणि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या वस्तुंना, ठिकाणांना, देवळांना शिवणे हा मोठा गुन्हा समजला जात होता.या स्पृश्यांमध्ये केवळ ब्राह्मणच नव्हे, तर मराठे आणि तत्सम अनेक जातींचे लोकही होते. अशा सामाजिक परिस्थितीत शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत स्वतःच जाहीर कृत्यांनी प्रस्थापित समाजाला हादरे दिले.शाहू महाराज १९२० मध्ये नागपूरला अखिल भारतीय बहिष्कृत परिषदेला अध्यक्ष म्हणून गेले होते. यात त्यांनी मुद्दामच अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला होता. पुढच्याच महिन्यात नाशकात अस्पृश्य वसतिगृहाच्या पायाभरणी समारंभासाठी गेले होते. इथं त्यांनी शेकडो लोकांच्या समोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचा चहा घेतला. याचीच पुनरावृत्ती त्यांनी तासगावला केली होती. शिवाजी महाराजांच्या वंशजानं त्याकाळात कर्मठ समाजासमोर अस्पृश्य व्यक्तीच्या हातचं अन्नपाणी घेणं, हा शाहू महाराजांनी दिलेला एक क्रांतिकारक संदेश होता.

          याच दरम्यान कोल्हापुरात घडलेली ही घटना महाराजांच्या अस्पृश्यता निवारणाच्या कार्याचा मैलाचा दगड ठरली. 

*पाण्यासाठी गंगाराम यांना मारहाण...* 
           कोल्हापुरातल्या बावडा बंगल्याच्या आवारात सर्व नोकरचाकरांची कामं सुरू होती. त्यात गंगाराम कांबळे हे सरकारी पागेतील मोतद्दारही होते. जेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ गडबड उडाली. तिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम नावाचा एक मराठा शिपाई आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील घोड्याच्या पागेतील मोतद्दारास जबरदस्त मारहाण करत होते.कारण होतं, त्यानं पाणी पिण्यासाठी मराठ्यांसाठी असलेल्या हौदाला स्पर्श केल्याचं.एका अस्पृश्यानं हौद बाटवला म्हणून संताराम आणि त्याचे साथीदार हातात चाबूक घेवून गंगाराम यांची पाठ फोडून काढत होते. त्यांनी त्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला.खरं तरं १९१९ ला शाहू महाराजांनी सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता न पाळण्याचा जाहीर हुकूम काढला होता. महाराजांचं या संदर्भातलं धोरण माहीत असूनही त्यांच्या संस्थानात ही घटना घडली होती. हे सर्व घडत असताना महाराज काही कामानिमित्त दिल्लीला गेले होते.ते दिल्लीहून येण्याची गंगाराम वाट पाहात होते. महाराज कोल्हापूरला आले. त्यांचा मुक्काम कोल्हापूर शहराबाहेरील सोनतळी इथं होता. महाराज आल्याचं कळताच गंगाराम अस्पृश्य बांधवांसह महाराजांना जाऊन भेटले. महाराजांनी गंगाराम कांबळे यांनी येण्याचं कारण विचारले. गंगाराम कांबळे यांना हुंदका अनावर झाला त्यांनी त्यांची पाठ उघडी करून दाखवली आणि झालेला सर्व प्रकार महाराजांना सांगितला. गंगाराम कांबळेंवर झालेल्या अत्याचाराची कथा ऐकून महाराजांच्या डोळ्यात अंगार फुलत होता. ताबडतोब त्यांनी गंगाराम कांबळेंना ज्यांनी मारलं त्यांना बोलावलं आणि स्वतःच्या हातात घोड्याची कमची घेऊन त्यांच्या पाठी फोडून काढल्या.हे करत असताना हा मराठा आहे, असा विचार त्यांनी केला नाही आणि गंगाराम यांच्या समोर त्यांना शिक्षा दिली.मग त्यांनी गंगाराम यांना जवळ घेतलं. त्यांच्या पाठीवरून मायेचा हात फिरवला. ते म्हणाले, "जा, गंगाराम तुला नोकरी माफ केली. तू कोणताही स्वतंत्र धंदा कर. लागेल ती मदत माझ्याकडे माग."अस्पृश्यांनी वरच्या दर्जाच्या लोकांप्रमाणे काही व्यवसाय करणे हे त्या काळच्या समाजाला पचणारं नव्हतं. तरीही शाहू महाराजांनी गंगाराम कांबळे यांना व्यवसाय करण्याचा मार्ग खुला केला....आणि हॉटेल सुरू झालेपुढे काही दिवसांतच गंगाराम कांबळे यांनी शाहू महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल सुरू केलं.त्यांच्या हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम चहा कुणालाही लाजवेल असा होता. पण ते अस्पृश्याचं हॉटेल आहे, असे समजताच सवर्ण मंडळी या हॉटेलात जायची बंद झाली. एका अस्पृश्यानं सर्वांना चहा द्यावा, या विचारानेच सवर्ण मंडळी संतप्त झाली होती.ही बातमी महाराजांना समजायला वेळ लागली नाही. समाज हा कायदे करून बदलत नाही, त्यासाठी काही नामी युक्त्या कराव्या लागतात. समाजाला गोड बोलून परिवर्तनाच्या दिशेनं वळवावं लागतं, याची महाराजांना जाण होती.त्यामुळे कोल्हापुरात फेरफटका मारताना त्यांची घोडागाडी (खडखडा) गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली.महाराज त्यांच्या गडगडाटी आवाजात चहाची ऑर्डर देत आणि गंगाराम मोठ्या आदबीनं महाराजांना चहा देत असत.महाराज तो चहा स्वतः घेतच पण त्यांच्या घोडागाडीत खच्चून भरलेल्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना ते आग्रहानं चहा पाजत. छत्रपती खुद्द गंगाराम यांच्या हॉटेलातला चहा घेत असल्यानं त्यांच्या चहाला नाही म्हणण्याची कोणाची छाती होत नसे. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा प्रसंग इतिहासप्रसिद्ध झाला. महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी दोन मार्ग अवलंबले. एक मार्ग कायद्याचा आणि दुसरा म्हणजे आपल्या जाहीर आणि सार्वजनिक कृत्यातून समाजातील अस्पृश्यतेच्या रूढीला सुरुंग लावणे...
         एक राजा म्हणून पहिला मार्ग तर त्यांनी अवलंबलाच पण गंगाराम कांबळे यांच्या घटनेबद्दल दुसरा मार्ग अवलंबताना त्यांची आईची माया दिसून आली. 
  
              याच गंगाराम कांबळे यांनी महाराजांच्या निधनानंतर तीन किंवा चार वर्षांनी शाहू महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी एक मंडळ स्थापन केलं होतं. या मंडळानं १९२५ ला शाहू महाराजांचं पहिलं स्मारक कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत उभारलं. महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण देशातलं शाहू महाराजांचं हे पहिले स्मारक गंगाराम कांबळे यांच्या पुढाकारानं दलित समाजानं उभारलं होतं. 

(या लेखाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातील संवादाचा सविस्तर उल्लेख भाई माधवराव बागल यांनी १९५० साली लिहिलेल्या श्री. शाहू महाराज यांच्या आठवणी या पुस्तकात आहे.)...

-लेख: डॉ.मंजुश्री पवार....✍️

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

संक्रांत शुभेच्छा

'गोडगोड' बोलणा-यांना तिळगुळ मिळतात. 
भीडभाड न बाळगता, जे थेट बोलतात, त्यांच्यावर मात्र 'संक्रांत' ओढवण्याचा हा काळ आहे! 
अशावेळी आपण कोणासोबत आहोत?

खरे म्हणजे आपण सारेच गोड आहोत. गोड असायला हवेही. का बरे कटुता आणि कशाला कडवट वा तिखट बोलायला हवे? असे बोलण्याची वेळ येऊ नये हे खरे, पण तरीही प्रसंगी आत्यंतिक झोंबणारे असे काही बोलावे लागते. अनेकांना दुखावणारे असे मांडावे लागते. कोणाला हेतूतः दुखावणे, कोणी दुरावणे हा त्या मागचा हेतू नसतो. नसावा.  

लोक दुखावण्याची पर्वा केली असती, तर पंधराव्या शतकात पोलंडमध्ये जन्मलेल्या कोपर्निकसाने सूर्यच पृथ्वीभोवती फिरतो, हे तेव्हाचे प्रस्थापित प्रमेय मान्य केले असते. पण, त्याने भीडभाड न बाळगता सांगितले - केंद्रस्थानी सूर्य आहे. पृथ्वी नाही. 
त्याच्या पुस्तकावर बंदी लादली गेली. कोपर्निकस आजारी पडून मेला, म्हणून वाचला. 

पण, त्याचे हे पुस्तक पुढे जर्दानो ब्रूनो या वैज्ञानिकाच्या हाती लागले. त्यावर त्याने आणखी काम केले. 'पृथ्वी गोल आहे आणि ती अविरत सूर्याभोवती फिरते. सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही', हे त्याने सांगितले. सिद्ध केले. पण, धर्मसत्ता खवळली. 'बायबल'मध्ये जे आहे, त्याच्या विपरित कोण कसे सांगू शकते, म्हणून चवताळली. ब्रूनोला चर्चने अटक केली. त्याची जीभ कापली. रोमच्या चौकातून त्याची नग्न धिंड निघाली. त्याला जिवंत जाळले गेले. 

तरीही, ब्रूनो संपला नाही. त्याच रोमन साम्राज्यात गॅलिलिओ जन्माला आला. त्याने सतराव्या शतकात हीच मांडणी पुढे नेली. पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवतीही फिरते. म्हणून तर दिवस उजाडतो, रात्र होते. म्हणूनच तर ऋतूंचे सोहळे इथे दिसतात. गॅलिलिओला नोबेल नाही मिळाले. अटक झाली. त्या अटकेतच तो मेला. पण, नजरकैदेतही त्यानं पुस्तक लिहिलं आणि जगाला कैदमुक्त नजर दिली. 
ही नावं माहीत तरी आहेत. असे किती असतील, ज्यांची कुठे नोंदही नाही! अशी ही माणसं बोलत राहिली. मांडत राहिली. भांडत राहिली. 

तेव्हा कैक दुखावले, पण त्यामुळेच तर उजाडले ना! 

आजचा 'मकर संक्रांत' हा दिवसच मुळी पृथ्वीचे प्रेमगीत ऐकवणारा. पृथ्वीच्या परिभ्रमणाचा टप्पा दाखवणारा. समुद्राला नवी गाज देणारा. शेतीचे-मातीचे नाते सांगणारा. त्याच्यावर ना धर्माचे ओझे, ना कोणत्या अस्मितेचे त्याला काही देणेघेणे. मकर राशीत प्रवेश करणारा सूर्य. उत्तरायण सुरू होते आणि मग संक्रांत येते. आजचा दिवस खरोखरच सणासारखा साजरा करण्यासारखा. 

संक्रांतीला आज गोड बोलण्यासाठी कित्येकांनी स्वतःला जिवंत जाळून घेतले. तुरूंगवास भोगले. जिभा कापल्या गेल्या. 
तेव्हा हे लोक तिखट बोलले नसते, तर आज असे उजाडले असते? आज तरी आपण कोपर्निकस-ब्रूनो-गॅलिलिओची वाट चोखाळणार की त्याच नादान, बेमुर्वतखोर धर्मांध सत्तेच्या वाटेने चालणार?
 
गोड बोलायचं हे खरंच. पण मला सांगा. खरा गोड आवाज कोणता? 
साखळदंड खळाखळा तुटण्याचा. 
तो गोड आवाज सर्वांना, सर्वदूर ऐकू यावा म्हणून थोडे तिखट बोलावे लागेलही. 
पण, त्याशिवाय 'उत्तरायण' कसे सुरू होणार? 

गॅलिलिओच्याच काळात, ज्याला सदेह वैकुंठाला धाडले गेले, त्या आपल्या बापाने, साक्षात तुकोबानेच सांगून ठेवले आहे - 

"मऊ मेणाहूनि आह्मी विष्णुदास । कठिण वज्रास भेदूं ऐसे ॥
मेले जित असों निजोनियां जागे । जो जो जो जें मागे तें तें देऊं ॥
भले तरि देऊं कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी ॥"

पुढे आमचा बा तुकोबा काय म्हणतो, ते पाहा. मायबापापेक्षाही आम्ही मायाळू आहोत, पण प्रसंगच आला तर शत्रूपेक्षाही अधिक घातपात करू. अमृताहून आम्ही गोड खरे, पण वेळ आलीच तर, विषही लाजेल, असे कडू आहोत आम्ही! 
 
"मायबापाहूनि बहू मायावंत। करूं घातपात शत्रूहूनि॥
अमृत तें काय गोड आह्मांपुढें। विष तें बापुडें कडू किती॥
तुका ह्मणे आह्मी अवघे चि गोड। 
ज्याचें पुरे कोड त्याचेपरी॥"

त्यामुळे, आपण आहोत गोडच. पण, अवघे जग गोड व्हावे, अशी मनोकामना असेल, तर प्रसंगी कडवटपणा घ्यावा लागेल. 

सध्या तरी चित्र असे दिसते आहे की, संक्रमण सुरू झाले आहे. 
बदल होऊ पाहातो आहे. 
आणखी जोर लावू. 
गोड असो की तिखट, पण प्रत्येकाला बोलता येईल, प्रत्येकाला आवाज मिळेल, यासाठी बोलत राहू. चालत राहू. 
संवाद हीच तर माणसाची भूक आहे. 
जगण्याचे प्रयोजन आहे आणि पूर्वअटही. 

संक्रांतीच्या आज अपार, आभाळभर सदिच्छा. 
ना पृथ्वी थांबली कधी, ना सृष्टी थांबते. 
मग आपण का थांबायचे? 
अविरत चालत राहायचे. 

मकर संक्रांतीच्या याच तर सदिच्छा. 

- संजय आवटे