अहिल्यादेवी तेथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी अन्य महिलांनाही लष्करी शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र काढले. महिलांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी जगात निघालेले हे पहिले विद्यालय. त्या काळात देशभर संतती नसलेल्या विधवांची मालमत्ता सरकार दरबारी जमा करायचा कायदा होता. अहिल्यादेवींनी तो कायदा रद्द तर केलाच पण विधवांना कोणतेही मुल दत्तक घेण्याचीही कायदेशीर तरतूद केली. महेश्वरला वस्त्रोद्योगात आघाडीवर आणत असतांनाच महिला विणकरांनाही प्रोत्साहन दिले. त्या काळात बालविवाहाची प्रथा होती. ती मोडून काढण्यासाठी त्यांनी स्वत:च्या मुलीचा प्रौढ विवाह करुन स्वत: आदर्श घालून दिला. एवढेच नव्हे तर जो तरुण माळव्यातील दरवडेखोरांचा उपद्रव नष्ट करीन अशा कोणाही युवकाशी तिचा विवाह लावून देईन असे दरबारात घोषित करून जातीची अटही काढून टाकली. हे काळाच्या फार पुढचे पाऊल होते हे आम्ही कधीच लक्षात घेतले नाही.महिला सबलीकरण म्हणजे काय हे त्यांनी अठराव्या शतकात कृतीतून दाखवले. आजच्या सरकारांनाही त्यापासून शिकायला हवे.
युरोपात एकोणिसाव्य शतकापर्यंत स्त्रीया दास्यातच होत्या. काही लेखिका स्त्री स्वातंत्र्याबद्दल दबकत बोलत असल्या तरी त्यांचे सामाजिक स्थान दुय्यमच होते. युरोपातील महिलांना जोन माल्कममुळे अहिल्यादेवी माहित झाल्या. युरोपातील महिलांसाठी हे नुसते आश्चर्य नव्हते तर त्यांनी अहिल्यादेवींत आपले आदर्श पाहिले. इतके कि जोआना बेली या इंग्रज कवयित्रीने अहिल्यादेवींवर खंडकाव्य लिहिले. विदेशी साहित्यिकाने कोणाही भारतीयावर लिहिलेले हे पहिले खंडकाव्य. युरोपातील स्त्रीयांच्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श निर्माण करणारी महिला अहिल्यादेवी असुनही आमच्यासमोर त्यांची प्रतिमा केवळ हातात पिंड घेतलेली साध्वी अशी निर्माण केली गेली. थोडक्यात खरा आदर्श पुसला गेला. भारतीय स्त्रीयांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली असती तर परंपरावाद्यांचे तेंव्हाच नाक ठेचले गेले असते व आज महिला अधिक आत्मसामर्थ्याने जगल्या असत्या.
कोणाच्या हातून काही काढून घेतले तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्याकालात यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत यात्रेकरुंकडुन भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कसायला जमीनीही दिल्या.
आज भारतातील वंचितांचे असंख्य पारंपारिक रोजगार नष्ट झाले अथवा केले गेले तरी त्यांना जगायचे अन्य पर्याय दिलेले नाहीत. आधुनिक तंत्रज्ञान त्यांच्याच पारंपारिक व्यवसायांत पुरवले नाही. सर्वांना नोकरीची गाजरे तेवढी दाखवली. वंचितांचे अधिक वंचितीकरण होत त्यांची ससेहोलपट मात्र होत आहे. येथे अहिल्यादेवींचे आदर्श घेत पर्याय उपलब्ध करुन दिले पाहिजेत. पण या अहिल्याबाई सांगणे त्यांच्या अडचणीचे आहे.
-संजय सोनवणी